आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एरंडवणेमधील ‘अनंत रेस्टो बार’वर दरोडा टाकणारे जेरबंद

Spread the love

पुणे : एरंडवणे येथील ‘अनंत रेस्टो बार’मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात नावे आल्याच्या रागातून काही आरोपींनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने रेस्टो बारवर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. डेक्कन पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

अजिंक्य रवींद्र ओवाळ (२१, रा. नर्‍हे), प्रचित लक्ष्मण काकडे (२४, रा. एरंडवणा गावठाण), यशराज उर्फ लड्ड्या शेडगे (रा. पर्वती) आणि प्रणव ढोंबळे (रा. ममता स्वीट, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १७ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजता अनंत रेस्टो बारमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून आरोपींनी ओंकार कदम व त्याच्या मित्राला मारहाण केली होती.

त्यानंतर प्रचित काकडे, संतोष कांबळे व राज सोनावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी पहाटे दीड वाजता बार बंद असताना पाच जणांनी शटर वर करून आत प्रवेश केला. त्यांनी बार व्यवस्थापकाला धमकी देऊन गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेले.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास डेक्कन पोलिसांनी सुरू केला. तपासादरम्यान पहिल्या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत प्रचित काकडे याने, मारहाणीच्या गुन्ह्यात नावे आल्यामुळे चिडून मित्रांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचे इतर साथीदारही पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. पुढे पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अजय भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.