खडक पोलिसांची कोलकत्ता येथे कारवाई : कच्चा माल आयात करण्याच्या नावाखाली घातला गंडा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुबईत कार्यालय उभारून टांझानिया देशातून कमी दरात कच्चा माल भारतात आयात करण्याच्या बहाण्याने पुण्यातील दोघा व्यावसायिकांना तब्बल ४ कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी कोलकत्ता येथून अटक केली आहे.
भुपेंद्रसिंग ऊर्फ संजय कुमार राघव (वय ५१, रा. कसना, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश, सध्या रा. मालाड, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सुधीर रघुनाथ बारोट (रा. रविवार पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भुपेंद्रसिंग ऊर्फ संजय कुमार राघव याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर बारोट यांच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची गरज होती. डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ या काळात त्यांची मुंबईतील ‘इंडो अफी मेटल्स Co. LLC’ आणि ‘सबपर्ला इंटरनॅशनल LLP’चे मालक भुपेंद्रसिंग उर्फ संजय कुमार राघव आणि त्यांचा मुलगा प्रन्वीरसिंग संजय कुमार राघव यांच्याशी ओळख झाली. दुबई आणि टांझानिया येथे कारखाने असल्याचे सांगत आरोपींनी बारोट यांना कच्चा माल पुरवण्याची हमी दिली.
बारोट यांना दुबईला बोलावून तेथून टांझानिया येथे घेऊन जाऊन ७५ टन स्क्रॅप मटेरियल दाखवण्यात आले. त्यानंतर तो माल गुजरातमधील मुंद्रा पोर्ट येथे आयात करण्याचा करार करीत विश्वास संपादन करण्यात आला. या करारानुसार बारोट यांनी आरोपींच्या अबुधाबी बँकेतील खात्यावर ३ कोटी ७९ लाख ७७ हजार ३७५ रुपये जमा केले; मात्र त्यानंतर ना कच्चा माल मिळाला, ना रक्कम परत मिळाली.
याचप्रकारे या दोघा पिता–पुत्रांनी पर्वती दर्शन येथील व्यावसायिक मिलिंद रवींद्र नाशिककर यांची ९० लाख रुपयांची फसवणूक केली होती. भुपेंद्रसिंग हा कोलकत्ता येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर खडक पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. त्यांनी २० नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करून पुण्यात आणले. न्यायालयाने त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बोराडे, सहायक फौजदार संतोष मोहिते, हवालदार राजाराम गाडवे, किरण खुडे, किरण घुटे आणि पोलीस अंमलदार संतोष साबळे यांनी केली आहे.
अनेक राज्यात केली फसवणुक
भुपेंद्रसिंग आणि त्याचा मुलगा प्रन्वीरसिंग यांनी कोलकत्ता, केरळ, उडिसा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. पुण्यातील दोघा व्यावसायिकांची त्यांनी फसवणूक केली असून, अशाच प्रकारे इतर कोणी फसवले असल्यास त्यांनी खडक पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.














