आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कुख्यात गुंड गजा मारणेला जामीन मंजूर

Spread the love

पुणे : शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरात वाहतूक कोंडीमधून उद्भवलेल्या वादातून आयटी अभियंत्याला मारहाण केल्या प्रकरणात कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

सिटी प्राइड थिएटरमध्ये चित्रपट पाहून गजा मारणे व त्याचे साथीदार हे घरी जात असताना, शिवजयंतीच्या मिरवणुकीमुळे कोथरूडमध्ये वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी झालेल्या वादातून मारणे टोळीतील गुंडांनी आयटी अभियंत्याला मारहाण केली.

सुरुवातीला कोथरूड पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता; मात्र केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक्षेपानंतर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात गजा मारणे याने चिथावणी दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला.

तो स्वखर्चाने कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, गजा मारणे याला सातारा कारागृहात नेत असताना, पोलिस व्हॅन थांबवून त्याला हॉटेलमध्ये बिर्याणी खाऊ घातल्याचा तसेच सातारा जिल्ह्यातील गुंडांची भेट घडवून आणल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

त्यामुळे बंदोबस्तावरील संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात अॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी दाखल केलेला जामिनाचा अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केला आहे.