कोट्यवधींच्या शासकीय जमिनीच्या व्यवहारात गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंढवा येथील कोट्यवधींच्या शासकीय जमिनीचा गैरव्यवहार करून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीला विकल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व कुलमुखत्यारधारक शितल किसनचंद तेजवानी हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. चौकशीसाठी बोलावलेल्या शितल तेजवानीचा सहभाग चौकशीत निश्चित झाल्याने तिला अटक करण्यात आली असून तिला उद्या (गुरुवार) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणात यापूर्वी अमेडिया एंटरप्रायजेस कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले होते. मुंढवा येथील शासकीय जमिनीच्या मुळ वारसदारांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेऊन शितल तेजवानी कुलमुखत्यारधारक बनली होती.
जमिनीची मालकी शासकीय संस्थेकडे असताना, केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ही जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला तब्बल ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. शितल तेजवानीविरोधात जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन आणि खडक पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

















