कोथरुडमध्ये राहत असताना कल्याणीनगरातील पत्त्यावर बनावट कागदपत्राद्वारे मिळविला शस्त्रपरवाना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गँगस्टर नीलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे याच्या घरातून ४०० काडतुसे जप्त केल्यानंतर त्याने राहण्याचा बनावट पत्ता देऊन शस्त्रपरवाना मिळविल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय महादेव सरोदे (रा. योगीराज बिल्डिंग, वृंदावन, कोथरुड), एजंट निलेश फाटक आणि त्यांना मदत करणाऱ्या इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अजय सरोदे हा गँगस्टर नीलेश घायवळ याचा साथीदार आहे. त्याच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर नीलेश घायवळ याने गोळीबाराचा सराव केल्याचे समोर आले आहे.
अजय सरोदे याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रपरवाना तपासला. तो कोथरुडमधील योगीराज बिल्डिंगमध्ये राहत असताना त्याने एजंट निलेश फाटक यांच्या मदतीने फ्लॅट नं. १५, प्लॉट नं. ३६, स. नं. २०९/४ कल्याणीनगर या पत्त्याची बनावट कागदपत्रे तयार करून ती येरवडा पोलीस ठाण्यात सादर केली.
या दोघांनी खोटे दस्तऐवज खरे असल्याचे भासवून खोटी माहिती देऊन खोटा पुरावा सादर केला. त्याद्वारे शासनाची व पोलिसांची दिशाभूल व फसवणूक केली असून, ३० जानेवारी २०२४ रोजी नवीन शस्त्रपरवाना मिळवला आहे.
त्या अगोदरच्या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रपरवाने देण्यात आले होते. २०२३ मध्ये १८६, २०२२ मध्ये २७९ आणि २०२१ मध्ये १५२ शस्त्रपरवाने देण्यात आले. या शस्त्रपरवान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले होते.
शस्त्रपरवान्यावर आणले निर्बंध
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ३० जानेवारी २०२४ रोजी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शस्त्रपरवाना देण्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या दीड वर्षात शस्त्रपरवाना मागणाऱ्या लोकांचे तब्बल ४०४ अर्ज फेटाळण्यात आले. तसेच १०४ व्यक्तींचे शस्त्रपरवाने रद्द केले आहेत. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ४३ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. नूतनीकरण न केल्यामुळे आणखी ९७ परवाने रद्द करण्यात आले. एकूण १४० परवाने रद्द करण्यात आले असून काही अर्जदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नव्याने केवळ २८ जणांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये १० वारसा हक्क आणि ९ खेळाडू कोट्यातील व्यक्तींचा समावेश आहे.















