गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची नर्हे येथे कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करत असताना मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने कारवाई करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १ गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांच्यासह आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची १९ डिसेंबर रोजी तपासणी करत होते.
वारजे परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार शिंदे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक जण पिस्टल घेऊन नर्हे-धायरी रोडवरील मते प्लॉट येथे उभा आहे.
पोलीस पथकाने तत्काळ तेथे जाऊन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त करून पुढील कारवाईसाठी त्या अल्पवयीन मुलाला नर्हे पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारू, पोलीस अंमलदार कैलास निम्हण, मोहम्मद शेख, किशोर शिंदे, अमित बोडरे, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांनी केली आहे.















