शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने पुण्यात एकाच दिवसात ११ गुन्हे दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शेअर बाजारातील गुंतवणुकीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुणे शहर पोलीस दलात एकाच दिवसात वेगवेगळ्या ११ गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यामध्ये एकूण २ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
खराडी परिसरातील एका ५८ वर्षीय नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ३८ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चंदनगर भागातील एका तरुणाचीही गुंतवणुकीच्या आमिषाने ५ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
घोरपडी गावातील बी. टी. कवडे रस्ता परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी १७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली असून, याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हडपसर भागातील एका नागरिकाची ३४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
हडपसरमधील काळेपडळ परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची गुंतवणुकीच्या आमिषाने १९ लाख ५४ हजार रुपये, तर कोंढवा परिसरातील एका नागरिकाची २८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
विश्रांतवाडी येथील धानोरी भागात राहणाऱ्या एका तरुणाची ५ लाख ६८ हजार रुपये, तर त्याच भागातील दुसऱ्या तरुणाची १० लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कोंढवे धावडे परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची गुंतवणुकीच्या आमिषाने ३१ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खराडी परिसरातील एका तरुणाची शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने ५२ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचेही उघड झाले आहे.















