कोरेगाव भीमा जयस्तंभाला अभिवादनासाठी आलेल्या महिलांचे दागिने लंपास : २० लाखांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी राज्यभरातून लाखो भाविक येतात. या गर्दीचा गैरफायदा घेत महिलांची मंगळसूत्रे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट–६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत सहा गुन्हे उघडकीस आणून आरोपींकडून २० लाख ४ हजार रुपये किमतीचे, १६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सुभाष चंद्रकांत जाधव (वय ३९, रा. शिरापूर धुमाळ, ता. शिरूर, जि. बीड व कालिकानगर, जि. बीड) आणि लहु संतराम गायकवाड (वय ३०, रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दरवर्षी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांकडून व्यापक नियोजन व बंदोबस्त केला जातो. मागील वर्षी या गर्दीत काही महिलांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. हे गुन्हे अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला ते उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट–६ च्या पथकाने अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार काशिनाथ कारखेले, नितीन मुंडे, साळवे, ताकवणे व व्यवहारे यांच्या पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अखेर १८ डिसेंबर रोजी सुभाष जाधव आणि लहु गायकवाड यांना बीड येथून ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान हडपसर येथील २०२४ मधील एक गुन्हा, लोणीकंद येथील जानेवारी २०२५ मधील दोन गुन्हे, तसेच वाघोली, लोणी काळभोर आणि स्वारगेट येथील प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण सहा मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून २० लाख ४ हजार रुपये किमतीचे, १६७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांच्या पथकाने केली आहे.















