प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप यांच्यासह सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महिलेवर हृदयशस्त्रक्रिया करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा ठपका ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने ठेवल्यानंतर वानवडी पोलिसांनी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. रणजित जगताप तसेच राममंगल हॉस्पिटल, फातिमानगर (वानवडी) येथील शस्त्रक्रियेत सहभागी असलेले त्यांचे सहकारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लिलावती मधुकर जायभाये (वय ६२) यांचा १९ नोव्हेंबर २०२५ रोजी राममंगल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांचे पुत्र विजय मधुकर जायभाये (वय ४४, रा. बुलढाणा) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आई लिलावती जायभाये यांच्यावर १९ ऑक्टोबर २०२४ रोजी राममंगल हॉस्पिटलमध्ये डॉ. रणजित जगताप यांनी हृदयशस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर प्रकृती स्थिर असल्याचे सांगून त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्यांना निमोनियाचा त्रास झाल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. रणजित जगताप यांच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोप विजय जायभाये यांनी केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी राममंगल हॉस्पिटलमधील उपचारांशी संबंधित सर्व कागदपत्रे जप्त करून ती ससून रुग्णालयाकडे तपासणीसाठी पाठवली होती.
ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने चौकशी करून सादर केलेल्या अहवालात डॉ. रणजित जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यामुळे लिलावती जायभाये यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या आधारे वानवडी पोलिसांनी निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशिष जाधव करीत आहेत.















