गुन्हे शाखेच्या युनिट-१ मधील हवालदारांवर पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मटका जुगार चालविणाऱ्यांशी संपर्क ठेवत असल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकातील दोन पोलीस हवालदारांना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
निलंबित हवालदारांची नावे शुभम जयवंत देसाई व अभिनव बापुराव लडकत अशी आहेत. ते दोघेही गुन्हे शाखेच्या युनिट-१ मध्ये सध्या कार्यरत होते. समर्थ पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी मटका घेणार्या औदुंबर अर्जुन सोनावणे (वय ६५, रा. नागेश्वर मंदिराजवळ, सोमवार पेठ) याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान औदुंबर सोनावणे याने बाळा उर्फ प्रविण राजेंद्र चव्हाण (रा. सोमवार पेठ) याच्यासाठी मटका घेत असल्याचे सांगितले होते. बाळा चव्हाण याच्यावर कारवाई करून १७ नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या समोर हजर केले.
त्यावेळी आरोपीकडील मोबाईल क्रमांकाची पडताळणी केली असता त्यात या पोलीस हवालदारांचा त्याच्याशी संपर्क असल्याचे आढळले. पुढील पडताळणीदरम्यान शुभम देसाई हे आरोपीच्या मोबाईलवर कॉल करत असल्याचे समोर आले. या कॉलवर ते आरोपीबरोबर संशयास्पद पद्धतीने संपर्कात होते.
पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या अहवालानुसार या पोलीस हवालदारांचा आरोपीशी व तो चालवित असलेल्या अवैध धंद्याशी संबंध असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली. यापूर्वीही या संदर्भात त्यांना वारंवार तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध न ठेवण्याबाबतही सूचना होत्या. तथापि, त्यांच्या वर्तनात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही.
त्यामुळे शुभम देसाई व अभिनव लडकत यांनी कर्तव्यावर बेजबाबदार, बेफिकीर राहून जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरले असून नैतिक अध:पतनाचे गैरवर्तन केल्याने पोलीस दलाच्या हितसंबंधास अपाय झाला आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दोघांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.















