राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी: मुंबई विभागावर विजय
महाराष्ट्र जैन वार्ता
पिंपरी :पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संचेती इंग्लिश मीडियम स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे विभागातील संचेती इंग्लिश मीडियम स्कूलने मुंबई विभागाचा पराभव करत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत चमकदार खेळ करत न्हिदान पाडवे, विहान कोल्हाडे आणि अर्जुन श्रीगडीवार या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र ठरत शाळेची शान वाढवली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ही स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाच्या निवड चाचणीसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, सचिव वर्षा टाटीया, उपाध्यक्ष आदित्य टाटीया, खजिनदार ऐश्वर्या बेदमुथा आणि मुख्याध्यापक अभ्र प्रतीप राय यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.















