फुरसुंगी पोलिसांनी सव्वा सहा लाखांच्या दागिन्यासह गुन्हेगाराला केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजार्याचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याला फुरसुंगी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपयांचे ५ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत अभिजित मधुकर पठारे (रा. होळकरवाडी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी मित्राच्या लग्नाला गेले होते. त्यांचे घर बंद पाहून चोरट्याने त्यांच्या घराच्या टेरेसचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून चोरी करण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार सागर वणवे व पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुल पठारे याने ही चोरी केली असून त्यातील काही सोने महंमदवाडी येथील एका ज्वेलर्सकडे विक्री केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल पठारे याला घरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्याला नर्तकीसोबत बैठक व नाच–गाण्याचा शौक असल्याने त्यासाठी खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याचे त्याने सांगितले. चोरी केलेल्या पैकी काही सोने महंमदवाडी येथील सोनाराकडे विक्री केल्याचे आणि त्याबदल्यात मिळालेली ३० हजार रुपयांची रक्कम खर्च केल्याचेही निष्पन्न झाले.
आरोपीकडून विकलेले सोने व उर्वरित सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ४१ हजार रुपयांचे ५ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख, महेश नलवडे, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हरीदास कदम, सतीश काळे, पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर, बिभिषण कुंटेवाड, वैभव भोसले यांनी पार पाडली.















