समस्या ऐकून मार्गदर्शनाची हमी : प्रभाग ३८ मध्ये जनसंवादाची जोरदार सुरुवात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये भाजपचे संभाव्य उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसंवाद यात्रेला उत्साही सुरुवात केली. यात्रेची सुरुवात वाघजाई नगर येथील वाघजाई मातेच्या दर्शनाने झाली. मातेच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतल्यानंतर यात्रेला विधिवत प्रारंभ करण्यात आला.
यानंतर सोपान काका नगर, वाघजाई नगर, माऊली नगर आणि नर्मदा सिटी परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. प्रत्येक घरासमोर जाऊन, लोकांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्न काळजीपूर्वक ऐकण्यात आले.
नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यंकोजी खोपडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी आशीर्वाद, स्नेह आणि विश्वास व्यक्त करत स्थानिक नेतृत्वाकडून विकासाच्या नव्या अपेक्षा मांडल्या.
परिसरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, लाईट व्यवस्था आणि नागरी सुविधा अशा अनेक तातडीच्या प्रश्नांवर नागरिकांनी व्यथा व्यक्त केली. या प्रत्येक समस्येची गंभीर नोंद घेत, त्यावरील उपाययोजना करण्याचा ठाम निर्धार व्यकोजी खोपडे यांनी व्यक्त केला.
जनतेशी असलेला थेट संवाद आणि समस्यांना प्राधान्याने मार्गी लावण्याची त्यांची सकारात्मक भूमिका यांनी प्रभाग क्रमांक ३८ मध्ये स्थानिक पातळीवर नवी ऊर्जा निर्माण केली आहे. व्यंकोजी खोपडे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली जनसंवाद जनादेश यात्रा प्रभागात उत्साहाने आणि विश्वासाने पुढे जात आहे.
जनतेच्या समस्या माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कार्यसंघासाठी प्राधान्य आहेत. प्रत्येक नागरिकाचा आवाज ऐकून त्याचे समाधान करणे हीच माझी पहिली जबाबदारी आहे. – व्यंकोजी खोपडे















