मतदारांचा उत्साह ओसंडून : दोन्ही गट विजयासाठी झुंजणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेची धुरा कोणाच्या हातात जाणार? या प्रश्नाचे उत्तर शोधणारा आजचा मतदानाचा दिवस तालुक्याच्या राजकारणाला नवा वेग देताना दिसत आहे. पहाटेपासूनच मतदारांच्या तुफान गर्दीने निवडणूक वातावरण तापले असून मतदार मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत.
रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तालुक्यातील सर्व १० मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आणि काही क्षणातच मतदारांची लांबच लांब रांग दिसू लागली. समितीतील सत्तांतर किंवा सत्ता पुनरागमन, याचा निर्णय आजच्या मतपेट्यांमध्ये बंद होणार असल्याने निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रिया वेळेवर आणि शिस्तबद्धपणे सुरू झाली. बाजार समितीच्या कारभाराचे भवितव्य निश्चित करणाऱ्या या निवडणुकीत हमाल–तोलार गटातील 1,025 तसेच सहकारी संस्था गटातील 1,645 असे एकूण 2,670 मतदार आज मतदान करत आहेत.
बार्शी शहर आणि वैराग येथील केंद्रांवर विशेषतः हमाल–तोलार गटातील मतदारांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळत असून कोणत्या गटाचा झेंडा बाजार समितीवर फडकणार? याबाबत उत्सुकतेची पराकाष्ठा झाली आहे.
मतदान पारदर्शक रहावे म्हणून पोलिसांनी 100 मीटर परिसरात मोबाईल वापरावर बंदी घातली असून अधिकृत अधिकारी वगळता कोणीही मोबाईल नेऊ शकत नाही. कोणताही अनधिकृत प्रकार घडू नये म्हणून पोलिस दलाचा अभेद्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सोलापूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा येथून आलेल्या शंभर अधिकाऱ्यांची नेमणूक मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. मतदानाची वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून दिवसअखेर मतपेट्या सील केल्यानंतर उद्या, सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता उपळाई रोडवरील आदित्य कृष्णा मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
दोन्ही प्रमुख गटांनी आपल्या विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण ताकद लावल्याने बाजार समितीची सूत्रे कोणाच्या हातात जातील? यावर संपूर्ण तालुक्याची नजर रोखलेली आहे. मतदान शांततेत पूर्ण होत असले तरी उद्याचा निकाल हा बार्शीच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकतो अशी चर्चा मतदारांत रंगली आहे.















