महापालिकेजवळ दारू पिऊन घातला होता गोंधळ : गुन्हा कबुल केल्याने सुनावली शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिका इमारतीच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी दारू करून गोंधळ घालणाऱ्या दोघांना न्यायालयाने सामाजिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
विनोद वसंत माकोडे (वय ३२) आणि सागर रामकृष्ण बोदाडे (वय ३६, दोघे रा. सांगवी खुर्द, अकोला) अशी आरोपींची नावे आहेत. यापूर्वीही अशाच प्रकारे पुण्यात एका तरुणाला शिक्षा सुनावली होती. तेव्हा त्याच्याकडून वाहतूक नियमांशी संबंधित काम करून घेण्यात आले होते.
पोलीस अंमलदार मखरे व तायडे हे २ डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता पुणे महापालिकेच्या इमारतीच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालत असलेल्या दोघांवर कारवाई करत होते.
दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्यासमोर त्यांना हजर केले असता त्यांनी गुन्हा कबुल केला.
न्यायालयाने त्यांना ४ दिवस दररोज ३ तासांची सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ (क) अन्वये ही शिक्षा देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या देखरेखीखाली ही शिक्षा पूर्ण करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या सुचनेनुसार पोलीस अंमलदार सुधीर घोटकुळे, मखरे, तागडे व कोर्ट अंमलदार कांबळे यांनी ही कारवाई केली आहे.
















