भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक : पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची दिली होती धमकी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : इन्स्टाग्रामवर ओळख वाढविल्यानंतर अल्पवयीन मुलीमार्फत तरुणाला कात्रज घाटात बोलावून, पोक्सोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
अक्षय गंगाधर बुधेवार (वय २२, रा. गोकुळनगर, कात्रज), अमोल अंकुश शिंदे (वय २८, रा. कर्वेनगर, कोथरुड) आणि राहुल तानाजी शितोळे (वय २३, रा. लंबोदर अपार्टमेंट, महादेवनगर, कात्रज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे.
भूगाव येथील २८ वर्षीय तरुणाशी या मुलीने इन्स्टाग्रामवर ओळख वाढविली. ७ डिसेंबर रोजी त्याला कात्रज चौकात भेटायला बोलावण्यात आले. त्यानंतर बाईकवरून कात्रज घाटाकडे नेले. मध्येच एका ठिकाणी थांबविल्यानंतर तिचे साथीदार तेथे आले आणि त्यांनी तरुणाला मारहाण केली.
त्यानंतर त्याला येवलेवाडी येथे नेऊन पुन्हा मारहाण करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसे न करण्यासाठी ७० हजार रुपयांची खंडणी मागितली; त्यापैकी १० हजार रुपये त्याच्याकडून घेतले. उर्वरित रकमेकरिता वारंवार फोन करून दबाव टाकला जात होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड आणि तुकाराम सुतार हे आरोपींचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेली मुलगी अल्पवयीन असल्याचेही निष्पन्न झाले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नागेश पिसाळ, महेश बारवकर, मंगेश पवार, नवनाथ खताळ, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, किरण साबळे, मितेश चोरमोले, संदीप आगळे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे यांनी केली.
या टोळक्याने यापूर्वीही सासवड येथील एका तरुणाला अशाच प्रकारे लुटले होते. सासवड पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा त्याच पद्धतीचा गुन्हा केला असून, यावेळी दुसऱ्या मुलीचा वापर केला आहे.















