कात्रज–कोंढवा रोडवरील भरदिवसाची घटना : ९० हजारांचे दागिने घेऊन गेले पळून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून तिघा चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. सोनसाखळी व अंगठी रुमालात बांधून देण्याचे नाटक करून ते दागिने घेऊन मोटारसायकलवरून पळून गेले.
याबाबत माऊलीनगर येथे राहणाऱ्या ६३ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रज–कोंढवा रोडवरील मयुरेश सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर १० डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकरा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दूध आणण्यासाठी रस्त्याने चालत जात असताना मोटारसायकलवरून तिघे जण आले. त्यांनी हातातील डायरीमधून पेन बाहेर काढून ते फिर्यादीच्या नाकाजवळ नेले व त्यांना बोलण्यात गुंतवले.
नाव लिहून घेण्याचा बहाणा करून त्यांनी, “तुमच्या अंगावरील सोने काढा, मी रुमालात बांधून देतो,” असे सांगितले. फिर्यादींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व हातातील अंगठी काढली. ती दागिने रुमालात बांधण्याचे नाटक करून ते अचानक मोटारसायकलवरून निघून गेले.
९० हजार ५०० रुपयांची सोनसाखळी व अंगठी चोरीस गेली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करीत आहेत.















