साडेतीन लाखांची रोकड व १०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मंगळवार पेठ परिसरातील एका घरात अवघ्या पाऊण तासात झालेल्या घरफोडी प्रकरणी समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीद्वारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, चोरीतील मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी रेवती राजेंद्र सुर्वे (वय ५४, रा. शांती कॉम्प्लेक्स, मंगळवार पेठ) या १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. सव्वा सहा वाजता घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आढळले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
समर्थ पोलीस ठाण्याचे तपास पथक आणि गुन्हे शाखेने समांतर तपास करत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानुसार सुनिल मल्हारी तलवारे (वय ३८, रा. अजंठानगर, मशिदीजवळ, आकुर्डी) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील दागिने विक्रीसाठी शिवानंद दशरथ मोची ऊर्फ मोची मामा (वय ४०, रा. भीमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपये रोख असा एकूण ८ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरी व दरोडेखोरी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तसेच पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर व विनायक येवले यांनी केली.
सराईत घरफोड्या – सुनिल तलवारे हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर खराडी, चंदननगर पोलीस ठाणे तसेच महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
















