भूमच्या खेळाडूने धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम येथील स्वराज क्रीडा मंडळाची गुणवान खेळाडू वैष्णवी बाबर हिची महाराष्ट्र शालेय कबड्डी संघात निवड झाली असून तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
स्वराज क्रीडा मंडळाच्या आतापर्यंत पाच खेळाडूंनी महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केल्याने मंडळाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. राज्य शालेय कबड्डी संघासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीत वैष्णवी बाबर हिने प्रभावी खेळ, उत्कृष्ट कौशल्य व दमदार कामगिरीच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.
सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ करत तिने महाराष्ट्राच्या अंतिम संघात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र शालेय कबड्डी संघात निवड होणारी वैष्णवी ही भूम तालुक्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. वैष्णवी ही भूम येथील रवींद्र हायस्कूलची विद्यार्थिनी असून प्रा. डॉ. अप्पासाहेब हुबे तसेच रवींद्र हायस्कूलचे क्रीडाशिक्षक व एन.आय.एस. कोच अमर सुपेकर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
रवींद्र हायस्कूलच्या मैदानावर दररोज दोन सत्रांत सातत्याने केलेल्या सरावाचे हे यशस्वी फलित असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात होत आहे. वैष्णवीच्या निवडीची बातमी समजताच भूम शहरात खेळाडू व क्रीडाप्रेमींनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तिच्या या यशाबद्दल क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीही स्वराज क्रीडा मंडळाच्या स्वराज मुले, विश्वजित सुपेकर, यशोदीप कांबळे, ओम पाटील आदी खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदवून मंडळाचा नावलौकिक वाढविला आहे.
















