महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंढवा येथील केशवनगरमधील अल्कॉन सिल्व्हर लिफ सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसला होता. त्यानंतर शुक्रवारी कुंभारवाडा येथील सोसायटीच्या सीसीटीव्हीमध्ये पहाटे ४ वाजून ५४ मिनिटांनी बिबट्याचे दर्शन झाले.
कुंभारवाडा हा दाट वस्तीचा भाग असून येथे एक शाळाही आहे. गुरुवारपेक्षा शुक्रवारी हा बिबट्या आणखी दाट लोकवस्तीच्या भागात आल्याचे दिसून येते. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अगोदर एक कुत्रा पळत जाताना दिसतो. त्यानंतर कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो. बिबट्या एका बाजूने येऊन जाळीतून निघून जाताना दिसतो.
हा सर्व भाग नदीच्या काठाजवळ आहे. जवळच लष्कराचा भाग असून तेथे मोठी दाट झाडी आहे. हा बिबट्या दिवसा या झाडीत लपून बसत असावा. नदी जवळ असल्याने त्याच्या पाण्याची सोयही होत असावी.
सलग दोन दिवस बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. थंडीचे दिवस असल्याने सध्या लोक बाहेर पडत नाहीत. बिबट्याच्या दर्शनामुळे या भागातील नागरिकांनी पहाटे फिरायला जाणे बंद केल्याचे दिसून येत आहे.
वन विभागाने गुरुवारी या परिसरात बिबट्याचा शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही किंवा त्याच्या पाऊलखुणाही दिसल्या नाहीत. शुक्रवारी पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी परिसरात शोध घेणार आहेत.















