महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यात राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, मनसेतून कार्यरत असलेले युवा कार्यकर्ता अमित जगताप हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
कोंढवा परिसरातील प्रभाग क्रमांक ४० मध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेतून सक्रिय असलेले युवा कार्यकर्ता अमित जगताप हे नाव सध्या चर्चेत आहे.
कोणतेही घटनात्मक पद नसतानाही नागरिकांची कामे तातडीने करून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी कोंढवा भागात स्वतंत्र व विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमित जगताप हे स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय आहेत.
पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वीजपुरवठा, अतिक्रमण यांसारख्या दैनंदिन नागरी समस्यांमध्ये ते थेट नागरिकांच्या बाजूने उभे राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक प्रतिमा तयार झाली असून, राजकीय अनुभवापेक्षा प्रत्यक्ष कामातून मिळवलेली लोकप्रियता हीच त्यांची खरी ताकद मानली जात आहे.
दरम्यान, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित जगताप हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपकडून त्यांना संधी मिळाल्यास प्रभाग ४० मधील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
सध्याच्या परिस्थितीत भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट केल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. प्रभागातील रखडलेली विकासकामे, कात्रज–कोंढवा रस्त्याचा ज्वलंत प्रश्न, ठरावीक बांधकामांवरील निवडक अतिक्रमण कारवाई तसेच काही ठेकेदारांची कथित मक्तेदारी हे मुद्दे येत्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
या सर्व विषयांवर अमित जगताप यांनी यापूर्वीही उघडपणे भूमिका मांडत प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक नेटवर्क, युवकांमध्ये असलेली मजबूत पकड आणि ‘काम करणारा कार्यकर्ता’ अशी ओळख पाहता अमित जगताप हे केवळ उमेदवार नव्हे, तर प्रभाग ४० मध्ये ‘किंगमेकर’ ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
आगामी काळात ते कोणती राजकीय भूमिका घेतात, यावर प्रभाग ४० मधील राजकीय समीकरणे ठरणार असून, त्यांच्या निर्णयाकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.















