भवानी पेठेतील अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून घेत होता भाडे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गँगस्टर व आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर याला भवानी पेठेतील जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून त्यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत भवानी पेठेतील एका व्यावसायिकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) व मनेष ऊर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) यांच्याविरुद्ध खंडणी उकळणे, बेकायदा जमीन बळकावणे, अतिक्रमण करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
फिर्यादी यांच्या जमिनीचा आंदेकर याने बेकायदेशीररीत्या ताबा घेतला होता. त्या जमिनीवर इमारत बांधून त्यात भाडेकरू ठेवले होते. विकासासाठी जमिनीचा ताबा सोडण्यासाठी बंडू आंदेकर जमीनमालकाला धमकावत होता.
त्याबदल्यात दोन दुकाने किंवा दीड कोटी रुपये तसेच महापालिकेच्या कामासाठी ३० लाख रुपयांची खंडणी आंदेकरने मागितली होती. खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद देण्यात आली होती.
आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर न्यायालयीन कोठडीत धुळे कारागृहात आहे. त्याला समर्थ पोलिसांनी धुळे कारागृहातून ताब्यात घेऊन विशेष न्यायालयात हजर केले. आंदेकरने भाड्यापोटी पाच कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पैशांचा वापर कसा करण्यात आला, तसेच अन्य कोण लाभार्थी आहेत का, तसेच अशाच पद्धतीने आणखी कोणाची जमीन बळकावण्यात आली आहे का, याबाबत तपास करायचा आहे. आंदेकरला पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी सरकारी वकील अनिल कुंभार यांनी युक्तिवादात केली.
न्यायालयाने आंदेकरला शुक्रवार, २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वीही आंदेकर टोळीने मासळी बाजारातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
निवडणूक लढविण्यास परवानगी :- आंदेकर टोळीशी संबंधित अनेक जण यापूर्वी नगरसेवक झाले आहेत. गेल्या वर्षी हत्या करण्यात आलेला वनराज आंदेकर हाही नगरसेवक होता. बंडु आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आणि सून सोनाली यांना आयुष कोमकर खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंडू आंदेकर, त्याची भावजय व सुनेने महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने आंदेकर कुटुंबातील तिघांना निवडणूक लढविण्यास परवानगी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आंदेकर कुटुंब अजित पवार गटाकडे गेले असून, अजित पवार गटाकडून आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.















