वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडपर्यंत १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे काढला माग
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाघोली येथील रॉयल इनफिल्ड बुलेट चोरीच्या दुचाकीचा तपास करताना पोलिसांनी वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडपर्यंतच्या तब्बल १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेत दोघा सराईत वाहनचोरांना जेरबंद केले आहे. वाघोली पोलिसांनी ३ वाहने जप्त केली आहेत.
रामेश्वर अंकुश धनगर (वय २८, रा. गणेशनगर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि आजीनाथ संभाजी माळी (वय २२, रा. सोनी सांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
वाघोली येथील साई सत्यम पार्क येथील पार्किंगमधून ५ डिसेंबर रोजी रात्री एक वाजता एक बुलेट दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार अमोल सरतापे आणि सुनील कुसाळकर यांनी वाघोलीपासून शेवगाव-नेवासा रोड या मार्गावरील १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मागोवा घेऊन आरोपींची नावे निष्पन्न केली.
त्यानंतर रामेश्वर धनगर आणि आजीनाथ माळी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच अधिक चौकशीत त्यांनी रांजणगाव एमआयडीसी आणि छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केलेल्या आणखी दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ आणि शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.

















