‘स्वच्छ’च्या कचरावेचक शालन वायला यांचा प्रामाणिकपणा, साडी देऊन केला सत्कार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कचरा संकलनाचे काम करताना कचऱ्यात सापडलेली लग्नाची सोन्याची अंगठी ‘स्वच्छ’ सहकारी संस्थेच्या कचरावेचक शालन लक्ष्मण वायला यांनी मूळ मालकाला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवून दिला आहे.
शालन वायला या २२ डिसेंबर २०२५ रोजी नेहमीप्रमाणे कसबा विश्रामबाग वाडा परिसरात दारोदार कचरा संकलनाचे काम करून परतल्या. त्यानंतर कचऱ्याचे वर्गीकरण करत असताना त्यांना एक तोळ्याची सोन्याची अंगठी सापडली.
त्यांनी ती अंगठी सुरक्षितपणे बाजूला ठेवून मूळ मालक प्रियंका जगदाळे यांना परत केली. गेल्या १० वर्षांपासून शालन वायला या ‘स्वच्छ’ कचरावेचक म्हणून जयश्री जगदाळे यांच्या घरी दारोदार कचरा संकलनाचे काम करत आहेत.
ही अंगठी जयश्री जगदाळे यांच्या सूनबाई प्रियंका जगदाळे यांची लग्नाची अंगठी होती. स्वयंपाक करताना मुलाच्या टिफिन बॉक्सच्या घाईगडबडीत अंगठी काढून ती कागदात गुंडाळली गेली आणि चुकून कचऱ्याच्या डब्यात टाकली गेली.
अंगठी हरवल्याचे लक्षात येताच घरच्यांनी शोध सुरू केला आणि शालन वायला यांच्याशी संपर्क साधला. यावेळी शालन वायला यांनी सापडलेली अंगठी कोणतीही शंका न ठेवता प्रामाणिकपणे परत केली. शालन वायला यांच्या प्रामाणिक वर्तनाने भारावून जाऊन जयश्री जगदाळे यांनी त्यांचा साडी देऊन सत्कार केला.
अशा प्रामाणिक कृतींना प्रोत्साहन मिळावे आणि इतरांसाठीही उदाहरण निर्माण व्हावे, हा या सत्कारामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी ‘स्वच्छ’ संस्थेचेही आभार मानले. कचरावेचकांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी शहरापुढे मांडली जात असून, संस्थेची मूलभूत मूल्ये त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अलीकडेच कचरावेचक अंजू माने यांनी रस्त्यावर सापडलेली १० लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग प्रामाणिकपणे परत दिल्याची घटनाही घडली होती.
या अंगठीची किंमत महत्त्वाची नाही, तर तिच्याशी जोडलेल्या भावना महत्त्वाच्या आहेत. ती माझ्या सूनबाईची लग्नाची अंगठी होती. शिक्षण क्षेत्रात काम करताना मी नेहमी विद्यार्थ्यांना कामात आणि आयुष्यात प्रामाणिकपणाचे महत्त्व सांगितले आहे. आज तोच प्रामाणिकपणा प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. – जयश्री जगदाळे, माजी प्राचार्य, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विद्यालय, पुणे















