महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणावर मद्यपान केले जाते. त्यानंतर दारूच्या नशेत वाहन चालवल्याने अपघात घडतात. अशा वाहनचालकांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक शाखेने तीन दिवस नाकाबंदी करून तपासणी करत २०१ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
वाहतूक शाखेने १९ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये ३० ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून तपासणी केली. या विशेष मोहिमेदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २०१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक दंड व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.
मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
















