प्रकृतीच्या कारणास्तव जोशी यांच्या जामीन अर्जावर आजच होणार होती शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुंतवणूकदारांची ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणासह चार फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या एक वर्षापासून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांना गंभीर आजार असल्याने जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज केला होता. शिवाजीनगर न्यायालयात त्यावर आजच सुनावणी होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
उदय जोशी आणि त्यांचे पुत्र मयुरेश जोशी हे गेल्या एक वर्षापासून फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होते. उदय जोशी यांना कारागृहात असताना शुक्रवारी सकाळी त्रास झाला. त्यामुळे येरवडा प्रशासनाने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच सकाळी साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले.
उदय जोशी हे भाजपचे माजी नगरसेवक होते. त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या देखील नगरसेविका होत्या. सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत अनेक गुंतवणूकदारांनी ठेवी ठेवल्या होत्या. उदय जोशी यांच्यासह सात जणांवर ५ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याशिवाय त्यांच्या गॅस एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्यावर एकूण चार गुन्हे दाखल केले होते. अटकपूर्व जामिनासाठी ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली होती. गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर वैद्यकीय कारणावरून जामीन मिळावा, यासाठी त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यावर न्यायालयाने कारागृह प्रशासनाकडून मत मागविले होते. या वैद्यकीय जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
















