कोंढवा पोलिसांची काकडे वस्तीत मोठी कारवाई : २ लाखांची दारू आणि १ कोटी २ लाखांची रोकड जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोंढवा परिसरात बेकायदा दारू साठवून विक्री करणाऱ्यांविरोधात कोंढवा पोलिसांनी मोठी कारवाई करत काकडे वस्तीतील एका दुमजली घरावर छापा टाकला. या कारवाईत देशी, विदेशी व हातभट्टीची दारू तसेच तब्बल १ कोटी २ लाख २६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा दारूचा साठा करून ठेवल्याच्या संशयावरून कोंढवा पोलिसांनी काकडे वस्तीतील एका दुमजली घरावर छापा टाकला. या कारवाईत २ लाख रुपयांची देशी, विदेशी व हातभट्टीची दारू तसेच तब्बल १ कोटी २ लाख २६ हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ही दारू व रोकड जप्त केली आहे.
हातभट्टी व देशी दारूची बेकायदा विक्री करणाऱ्या गुन्हेगाराकडे आतापर्यंत सापडलेली ही सर्वाधिक रोकड असल्याचे दिसून येत आहे. अमर कौर ऊर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदारसिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनीसिंग (सर्व रा. काकडे वस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला काकडे वस्ती येथील गल्ली क्रमांक २ मधील एका दुमजली घरात अवैध दारूचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता या पथकाने काकडे वस्तीतील घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना हातभट्टीची, विदेशी व देशी दारू असा एकूण २ लाख ५ हजार ९०० रुपयांचा माल सापडला. तसेच १ लाख ४१ हजार रुपयांची रोकडही मिळाली.
ही कारवाई झाल्यानंतर घरात आणखी रोकड असल्याचा संशय आल्याने पोलीस पथकाने पुन्हा घराची झडती घेतली. त्यावेळी बेडरूममधील एक कपाट नोटांनी भरलेले आढळून आले. या कपाटातील वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटा आढळून आल्या.
ही बाब समजताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नोटा मोजण्यासाठी दोन नोट मोजण्याची यंत्रे मागविण्यात आली. जवळपास पाच तास काही पोलीस अंमलदार नोटा मोजण्याचे काम करत होते. या कपाटात एकूण १ कोटी ८५ हजार ९५० रुपयांची रोकड आढळून आली.
आयकर विभागाने घेतली दखल
बेकायदा दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून येण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिली असून त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोंढव्यात येऊन प्राथमिक माहिती घेतली आहे. ही सर्व रोकड कधीपासून घरात साठवून ठेवण्यात आली होती आणि हा सर्व पैसा अवैध धंद्यातून मिळाला आहे का, याचा तपास सुरू आहे.
















