बार्शी शहर पोलिसांची कारवाई : १.९८ लाख रुपये फिर्यादीस परत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीसांनी चार वर्षांपूर्वी दाखल असलेल्या सायबर फसवणूक प्रकरणातील आरोपीस दिल्ली येथून अटक करून, गुन्ह्यातील संपूर्ण १ लाख ९८ हजार २०८ रुपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी महादेव विठ्ठल मिरगणे (वय ५३, व्यवसाय – शिक्षक, रा. म्हाडा कॉलनी, नवीन पाण्याच्या टाकीसमोर, गाडेगाव रोड, बार्शी) यांना अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादीकडून वैयक्तिक माहिती व मोबाईलवर आलेला ओटीपी घेतल्यानंतर काही वेळातच फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरून १,९८,२०८ रुपये रक्कम परस्पर काढून घेतल्याचा मेसेज प्राप्त झाला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाणे तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्याकडून सुरू होता.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सन २०२२ मधील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला असता हा गुन्हा अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी सदर गुन्हा पुढील तपासासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करून योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले.
तपासादरम्यान आरोपी दिल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीने पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोकॉ. दिगंबर बरबडे व पोकॉ. सचिन नितनात यांचे एक पथक दिल्ली येथे पाठविले. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हा नॉर्थ दिल्ली परिसरात राहत असल्याची खात्री केली.
यानंतर मागील आठवड्यात पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोकॉ. दिगंबर बरबडे, पोकॉ. सचिन नितनात व पोकॉ. अवी पवार यांचे दुसरे पथक दिल्ली येथे पाठविले.
या पथकाने बझार पोलीस ठाणे, नॉर्थ दिल्ली यांच्या सहकार्याने आरोपी नरेश महेशचंद शर्मा (वय ४५, व्यवसाय – मजुरी, रा. २२४०, बगीची रघुनाथ, नॉर्थ दिल्ली, दिल्ली) यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतले व बार्शी शहर पोलीस ठाण्यात आणले. बार्शी येथे आणल्यानंतर आरोपीने गुन्ह्यातील संपूर्ण १,९८,२०८ रुपये रक्कम फिर्यादीस परत केली.
ही संपूर्ण कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोकॉ. दिगंबर बरबडे, सचिन नितनात, अवी पवार तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोकॉ. रतन जाधव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
यावेळी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड किंवा बँकेतून बोलत असल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत ओटीपी देऊ नये. तसेच सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार नोंदवावी.
















