वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी, नातेवाईकाच्या घरातच चुलत पुतण्याचे कृत्य
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उत्तमनगर आणि वारजे माळवाडी येथील दोन घरफोड्या उघडकीस आणून चार जणांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून या दोन्ही घरफोड्यांमधील तब्बल दीड कोटी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये चुलत पुतण्यानेच आपल्या नातेवाईकाच्या घरात शिरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अरविंद प्रल्हादसिंग राजपुरोहित (वय २९, रा. कृष्णकुंज सोसायटी, म्हाळुंगे), अजय भागवत फपाळ (वय १९, रा. पॅव्हेलियन म्हाळुंगे रेसिडेन्सी, मूळ रा. बेलोरा, ता. माजलगाव, जि. बीड), कैलास दत्ता फपाळ (वय २५, रा. उत्तमनगर), बालाजी मधुकर ढगे (वय २४, रा. मोरे आळी, न्यू अहिरेगाव, वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत खिवसिंग हनुमानसिंग राजपुरोहित (वय ४८, रा. शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. १९ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार वाजेदरम्यान त्यांचे घर बंद असताना चोरट्याने कुलूप व लॅच लॉक तोडले.
लाकडी दरवाजाचे लॅच लॉक उघडून घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले ३४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने व साडेचार लाख रुपये रोख, असा एकूण ३९ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध तपास राबविण्यात आला.
पोलीस अंमलदार शरद पोळ व अमित शेलार यांनी गुन्ह्याच्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या परिसरातील तसेच आरोपीच्या संभाव्य मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. आरोपीच्या हालचाली, वेळेचे गणित, वापरलेली वाहने व त्याच्या हालचालींचा नमुना याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी गुन्हा केल्यानंतर रिक्षामधून पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
या रिक्षाचा शोध घेऊन रिक्षामालकाकडे चौकशी केली असता, त्यांनी ही रिक्षा एका मध्यस्थामार्फत अरविंद राजपुरोहित याला चालविण्यासाठी दिली होती, असे सांगितले. त्यावरून अरविंद राजपुरोहित याची चौकशी केली असता, तो फिर्यादी यांचा चुलत पुतण्या असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण १ कोटी रुपयांचा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उत्तमनगर येथील घरफोडीतील संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी येथील देवऋषी म्हणून काम करणारे सुरेश साधु वांजळे (वय ६५, रा. मोरे आळी, न्यू अहिरेगाव, वारजे) यांच्या घरातून स्टीलच्या टाकीमध्ये ठेवलेले २० लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने, असा एकूण ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी खिडकीवाटे प्रवेश करून चोरला होता. मागील दोन महिन्यांमध्ये ही चोरी झाली होती. हा गुन्हा १८ डिसेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात गोपनीय बातमीदारांचे प्रभावी जाळे सक्रिय करून तसेच मिळालेल्या माहितीनुसार संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तांत्रिक माहिती व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींची ओळख पटवून अजय फपाळ, कैलास फपाळ व बालाजी ढगे यांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान बालाजी ढगे याच्याकडून १८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १० लाख रुपये रोख तसेच कैलास फपाळ याच्या ताब्यातून १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ९ लाख २४ हजार रुपये रोख, असा एकूण १९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १९ लाख २४ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, नील बडाख यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार निखील तांगडे, अमित शेलार, योगेश वाघ, सागर कुंभार, महादेव शिंदे, शरद पोळ, बालाजी काटे, सत्यजित लोंढे, अमोल सुतकर, गणेश शिंदे, अमित जाधव यांनी केली आहे.















