पर्वती पोलिसांनी पिकअपसह १४ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे – सातारा रोडवरील कृष्णा चेंबर्ससमोर लावलेले पिकअप चोरून नेणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांनी अटक करून पिकअपसह १४ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
शिवा मिठ्ठुलाल यादव (वय २०, रा. वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती, चिखली, मूळ रा. सायन, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक नागेश सदाशिव गायकवाड (वय ३९, रा. ऊरुळी देवाची, फुरसुंगी) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नागेश गायकवाड यांना पुणे–सातारा रोडवरील कृष्णा चेंबर्स येथे धीरज ट्रान्सपोर्टचे भाडे होते. त्यांनी १९ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता आपल्या पिकअपमध्ये ५ लाख २९ हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा माल भरला. त्यानंतर भरलेल्या मालाची पावती घेण्यासाठी ते कार्यालयात गेले. त्या वेळी चुकून पिकअपची चावी गाडीतच राहिली.
ट्रान्सपोर्टचे मालक धनाजी लोंढे यांच्याकडून मालाची पावती घेऊन ते खाली आले असता, तोपर्यंत चोरट्यांनी मालासह पिकअप चोरून नेला होता. पर्वती पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक व स्वप्निल घुगे यांना गोपनीय बातमी मिळाली.
त्यावरून पोलिसांनी सापळा रचून शिवा यादव याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ९ लाख रुपयांचा पिकअप व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण १४ लाख ९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे, पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, सदाशिव कोपनर, पोलीस हवालदार प्रकाश मरगजे, प्रविण जगताप, पोलीस अंमलदार महेश मंडलिक, स्वप्निल घुगे, सूर्या जाधव, सद्दाम शेख, मनोज बनसोडे, अमोल दबडे, अमित चिन्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे व किर्ती भोसले यांनी केली आहे.















