70 ते 80 हजार जैन मतदानावर भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेसची नजर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 बिबवेवाडी, 21 महर्षी नगर आणि 40 कोंढवा हे तीन प्रभाग राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. या तिन्ही प्रभागांत मिळून सुमारे 70 ते 80 हजार जैन समाजाचे मतदान असल्याने, कोणता पक्ष जैन समाजातील उमेदवाराला संधी देतो याकडे संपूर्ण जैन समाजासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांतून जैन समाजातील अनेक इच्छुक उमेदवार पुढे आले आहेत. भाजपकडून प्रवीण चोरबेले, मनीषा चोरबेले, महेंद्र मुथा व जया मुथा, तर काँग्रेसकडून भरत सुराणा व अक्षय जैन ही नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.
विशेष म्हणजे भाजपमधील काही इच्छुक उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही ऑफर देण्यात येत असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांकडून मिळत आहे. राजकीय हालचालींना सध्या वेग आला असून, पुढील दोन दिवसांत उमेदवारीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या तिन्ही प्रभागांत जैन समाजाची भूमिका निर्णायक ठरणार असून, समाजाचा एकत्रित कौल कोणत्या पक्षाच्या बाजूने जातो यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. पाठीमागील निवडणुकांचा इतिहास पाहता, जैन समाजाने पक्षभेद न ठेवता सक्षम आणि विश्वासार्ह उमेदवारांना संधी दिल्याचे दिसून येते.
यापूर्वी एका निवडणुकीत अभय छाजेड (काँग्रेस) आणि मनीषा चोरबेले (भाजप) या वेगवेगळ्या पक्षांतील जैन उमेदवारांना समाजाने निवडून दिले होते. त्यामुळे यंदाही जैन मतदार ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असतील, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. एकूणच, पुणे मनपाच्या या तीन प्रभागांत जैन समाजाचा निर्णय अनेक राजकीय समीकरणे बदलणारा ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
















