बंडू आंदेकर याने ही भरला फॉर्म : आंदेकर कुटुंबियांना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजीस मनाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गँगस्टर बंडु आंदेकर याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी सकाळी आपले अर्ज दाखल केले. बंडु आंदेकरही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तातच या दोघींनी कार्यालयात जाऊन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले जात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी करू नये, असे आदेश विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत. आंदेकर कुटुंबातील उदयकांत आंदेकर आणि वनराज आंदेकर हे माजी नगरसेवक होते.
त्यांची पत्नी लक्ष्मी आणि वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. नाना पेठेतील टोळीयुद्ध आणि वर्चस्वाच्या वादातून गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने आयुष कोमकर याचा नाना पेठेत खून केला होता.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी आयुष कोमकर याचा खून करण्यात आला होता. बंडु आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आणि सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता.
निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, असे नमूद करून विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी आणि सार्वजनिक ठिकाणी भाषण करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
















