भेकराईनगरमधील घटना : पतीने स्वतः पोलिस चौकीत हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुळबाळ होत नसल्याचा ताण आणि पत्नीच्या चारित्र्याविषयी संशयातून पतीने पत्नीचा हाताने व दोरीने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना भेकराईनगर येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलिस चौकीत हजर झाला. फुरसुंगी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
प्रियांका आकाश दोडके (वय २७, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती आकाश विष्णु दोडके (वय ३५) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भेकराईनगर येथील राहत्या घरी घडली.
याप्रकरणी प्रियांका यांचे भाऊ सागर रामदास अडागळे (वय ३५, रा. नानगाव, दोंड) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दोडके हा वाहनचालक म्हणून काम करतो, तर प्रियांका ही गृहिणी होती. आकाश यांचे वडील व भाऊ धायरी येथे राहतात.
आकाश व प्रियांका हे दोघेच भेकराईनगर येथे वास्तव्यास होते. त्यांचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. सात वर्षे होऊनही अपत्य नसल्यामुळे आकाश हा पत्नीच्या चारित्र्याबाबत संशय घेऊ लागला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
शुक्रवारी रात्री पुन्हा वाद झाल्यानंतर आकाशने हाताने व दोरीच्या सहाय्याने प्रियांका हिचा गळा दाबून तिचा खून केला. ती निपचित पडलेली दिसताच तो जवळच्या पोलिस चौकीत गेला व आपण पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्रियांका घरात मृतावस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.















