हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इंटिरियर डिझाईनचे महत्त्व समजून घेतले : उद्योगभेटीतून मिळाला प्रत्यक्ष अनुभव
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष उद्योगातील अनुभवाची जोड देण्यासाठी सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अॅन्ड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) तर्फे पिरंगुट येथील जागतिक दर्जाच्या ‘ब्रिंटन कार्पेट्स आशिया प्रायव्हेट लिमिटेड’ येथे अभ्यासपूर्ण औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली.
या भेटीत विद्यार्थ्यांनी कार्पेट उत्पादनातील तांत्रिक व कलात्मक पैलूंचा सखोल अभ्यास केला. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात हॉटेलच्या अंतर्गत सजावटीला (Interior Decoration) अनन्यसाधारण महत्त्व असून पंचतारांकित हॉटेल्स व व्यावसायिक वास्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या कार्पेट्सचे डिझाइन, विणकाम प्रक्रिया आणि दर्जा तपासणीची संपूर्ण कार्यपद्धती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली.
कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनापर्यंतचा प्रवास अनुभवताना विद्यार्थ्यांनी उद्योगातील तज्ज्ञांशी संवाद साधून विविध तांत्रिक बाबी समजून घेतल्या व आपल्या शंकांचे निरसन केले. प्रत्यक्ष उद्योगात जाऊन प्रक्रिया पाहिल्यामुळे विषय अधिक प्रभावीपणे समजतो, असा अनुभव विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना जागतिक उत्पादन मानकांचा (Global Production Standards) प्रत्यक्ष अनुभव घेता आला. ब्रिंटन कार्पेट्सच्या तांत्रिक पथकाने कच्च्या मालाची निवड (Sourcing), प्रगत विणकाम तंत्रज्ञान, कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत उत्पादन व्यवस्थापनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील हॉटेल्स, लक्झरी रिसॉर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटर्समध्ये कार्पेट डिझाइनला असलेली मागणी, ग्राहकांच्या गरजेनुसार करण्यात येणारे बदल (Customization) आणि त्यातील व्यवस्थापनाचे बारकावे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समजून घेतले.
सैद्धांतिक अभ्यासक्रमातील ज्ञानाची औद्योगिक पातळीवर कशी अंमलबजावणी होते, याचा प्रत्यक्ष अनुभव या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान समृद्ध झाले असून ही औद्योगिक भेट त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
केवळ वर्गात शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष उद्योगात जाऊन प्रक्रिया पाहिल्याने विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो. अशा भेटींमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना कामाच्या प्रत्यक्ष जगाची ओळख होते. ब्रिंटन कार्पेट्समधील हा दौरा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी, विशेषतः हाऊसकीपिंग आणि इंटिरिअर मॅनेजमेंट यांसारख्या विभागांत काम करताना अत्यंत उपयुक्त ठरेल. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















