बनावट बँक खाती उघडून सायबर फसवणुकीसाठी वापर : आयटी तरुणाला फटका
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी आयटी इंजिनिअर तरुणाने हॉटेल रुम बुक करण्यासाठी आधार कार्ड दिले होते. मात्र रुम बुक न करताच त्या आधार कार्डचा वापर करून एकाच वेळी सहा बनावट बँक खाती उघडण्यात आली असून, ती सायबर फसवणुकीतील पैसे स्वीकारण्यासाठी वापरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मगरपट्टा येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय संगणक अभियंत्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मगरपट्टा येथे राहत असून ते संगणक अभियंता आहेत. ते बंगळुरू येथील एका कंपनीत कार्यरत असून वर्क फ्रॉम होम करत आहेत.
त्रिंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी जाण्याच्या उद्देशाने त्यांनी गुगलवर ऑनलाईन हॉटेल शोधले. त्यावेळी त्यांना ‘श्रीगजाननमहाराजसंस्था डॉट कॉम’ या वेबसाईटची लिंक दिसली. त्यावर संपर्क साधल्यानंतर त्रिंबकेश्वर येथे रुम बुक करण्यासाठी आधार कार्ड मागण्यात आले. बुकिंग कन्फर्म करून त्यांना एक क्यूआर कोड पाठविण्यात आला आणि ४ हजार १०० रुपये पेमेंट करण्यास सांगण्यात आले. त्यांनी गुगल पेवरून ४ हजार १०० रुपये पाठविले.
त्यानंतर समोरील व्यक्तीने जीएसटी लावायचा राहिल्याचे सांगून, आधी पाठविलेले पैसे परत करतो असे सांगत पुन्हा ४ हजार ३४६ रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांनी ही रक्कमही पाठवली. त्यानंतर पुन्हा फोन करून तुमच्या खात्यावर चुकून ४० हजार ९०० रुपये पाठविले असून तेच पैसे क्यूआर कोडवर परत पाठवा, असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी बँक खाते तपासले असता कोणतीही रक्कम जमा झालेली नव्हती. हे लक्षात आणून दिल्यानंतर समोरील व्यक्तीने फोन कट केला. रुम बुक न होता त्यांची एकूण ८ हजार ४४६ रुपयांची फसवणूक झाली.
यानंतर त्यांनी त्रिंबकेश्वरचे दर्शन घेऊन १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ई-मेल तपासला असता त्यांच्या आधार कार्ड क्रमांकावरून इंडियन ओव्हरसीज बँक, आरबीएल बँक, इंडसन बँक, फिनो पेमेंट बँक, जिओ पेमेंट बँक आणि एनएसडीएल पेमेंट बँक अशा सहा बँकांमध्ये खाती उघडण्यात आल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ १९४७ या क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवली तसेच सायबर हेल्पलाईन १९३० वर फसवणुकीची तक्रार दाखल केली.
दरम्यान संगमनेर येथे आधार ई-सेवा केंद्रात चौकशी केली असता त्यांच्या आधार कार्डवरील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलून दुसरा क्रमांक नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी बायोमेट्रिक पद्धतीने आधार कार्डवरील मोबाईल क्रमांक बदलून पत्नीचा क्रमांक नोंदवला आणि बायोमेट्रिक लॉक केले.
संगमनेर येथे इंडसन बँकेत जाऊन मॅनेजरची भेट घेऊन बनावट खाते बंद करण्यासाठी अर्ज दिला. त्यांच्या नावाने उघडण्यात आलेली सर्व बँक खाती बंद करण्यासाठी त्यांनी संबंधित बँकांना ई-मेलद्वारे तक्रारी पाठवल्या. मात्र बहुतेक बँकांनी त्याची दखल घेतली नाही.
हडपसर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार अर्ज दिला तसेच वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टानेही तक्रारी पाठवल्या. त्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी आरबीएल बँकेकडून खाते पडताळणीसाठी एक कर्मचारी आला. तेव्हा त्यांच्या नावाने आणि हाकाराम नावाने बनावट खाते उघडण्यात आल्याचे समोर आले.
त्यांनी दोन्ही खाती बंद करण्याची मागणी केली. ८ डिसेंबर रोजी बंगळुरू क्राईम पोलीस ठाण्याकडून त्यांना नोटीस प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.
बँकांचे वरतीमागून घोडे
फिर्यादी यांच्या नावाने बनावट बँक खाती उघडली गेली. त्यांनी इंडसन बँकेत जाऊन चौकशी केली़ तेव्हा त्या बँक खात फक्त १ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे बँकेने सांगितले होते. त्यांनी ते खाते बंद करण्याचा तक्रार अर्ज बँकेत दिला. त्यानंतरही त्याच इंडसन बँक खात्याचा वापर सायबर फसवणुकीमध्ये झाला होता. सायबर फसवणुकीचा पैसे या बँक खात्यात जमा झाला होता. या फसवणुकीचा बंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाला. त्याबाबत बंगलोर क्राईम पोलीस ठाणे येथून त्यांना ८ डिसेंबर रोजी नोटीस प्राप्त झाली. त्यावर त्यांनी तातडीने उत्तर दिले. त्यानंतर तब्बल सव्वा महिन्यांनी २४ डिसेंबर रोजी इंडसन बँकेकडून पत्ता पडताळणीसाठी कर्मचारी त्यांच्याकडे आला होता. तेव्हा त्यांनी हे खाते फ्रॉड असल्याचे सांगितले. असे बनावट बँक खात्याचा गैरवापर झाल्यानंतर बँकेकडून पडताळणी सुरु झाली. वरातीमागून घोडे असा अनुभव या फिर्यादीला आला.















