मीटरद्वारे पाणीपुरवठा झाल्यास नगराध्यक्षपदाचा राजीनामा देईन : संयोगिता गाढवे
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : भूम शहरातील मंजूर तसेच सुरू असलेली सर्व विकासकामे पूर्ण केली जाणार असून अमृत–२ योजनेचे कामही पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो पाणीपुरवठा मीटर न लावता केला जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी दिली.
आलमप्रभू शहर विकास आघाडीचे विजयी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. ज्या दिवशी मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देईन, असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अर्चना दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संयोगिता गाढवे म्हणाल्या की, भूम शहरातील विकासकामे कोणीही थांबवू शकणार नाही.नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील सर्व सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
माजी मंत्री तानाजी सावंत यांचा विकासकामांवर भर असल्याने निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. विरोधी गटातील निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्षपदाची खुर्ची फेकून देण्याची भाषा करीत आहेत; मात्र त्यांना त्यांच्या भाषेतच जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नूतन नगरसेवक सुरज गाढवे, रीमा शिंदे, तौफिक कुरेशी, अभिजित शेटे, भाग्यश्री माने, मंगल नाईकवाडी यांच्यासह आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे, सचिव मामू जमादार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, बाळासाहेब गवळी, प्रताप गाढवे, सूर्यकांत गाढवे, बाबा माने, अॅड. अमरसिंह ढगे, अॅड. पंडित ढगे, अख्तर जमादार, किरण जाधव, उद्धव सस्ते, रोहन जाधव, गोविंद साठे, बालाजी माळी, अनिल शेळके, माजी नगराध्यक्ष संजय शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बाबा पटेल, नारायण वरवडे, श्रीराम मुळे, सुधीर देशमुख, रहीम सौदागर, विष्णू शिंदे, सुनील थोरात, दत्ता साठे उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष संजय गाढवे म्हणाले की, जनतेने आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भरघोस मते देऊन विजयी केले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच मी जनतेच्या सेवेत तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.















