बंडू आंदेकर, नीलेश घायवळ, गज्या मारणे, टिपू पठाण यांच्या मालमत्तेवर आणली टाच
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी या टोळ्यांना ज्या गोष्टींमधून आर्थिक पुरवठा होतो, त्यावरच घाला घालण्याची आक्रमक भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. त्यातूनच बंडू आंदेकर, नीलेश घायवळ, गजानन मारणे, टिपू पठाण या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, वर्षभरात काही टोळी प्रमुखांकडून गंभीर गुन्हे घडले आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर विचारात घेतल्यास पोलिसांनी गुंड टोळ्यांविरुद्ध कडक कारवाईचे धोरण हाती घेतले आहे.
गुंड टोळ्यांचे म्होरके व त्यांच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) तसेच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुंडांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
हडपसरमधील टिपू पठाण टोळीतील सराईताचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. गुंड टोळ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. टोळ्यांचे आर्थिक स्रोत व त्यांच्या मालमत्तांची माहिती घेण्यात येत आहे.
टोळ्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. बंडू आंदेकर, गज्या मारणे, टिपू पठाण, नीलेश घायवळ या टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

















