ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून ४८ तासांत केली अटक, ७० लाखांचे ५६ तोळे दागिने जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खानापूर येथील सराफ दुकानात शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १ कोटी रुपयांचे ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून जेरबंद केले. त्यांच्याकडून ७० लाख ३२ हजार रुपयांचे ५६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अंकुश दगडू कचरे (वय २०, सध्या रा. जैन मंदिराजवळ, साईनगर, कात्रज, मूळ रा. सिंगापूर मोहरी, पो. वरोती, ता. वेल्हे), गणेश भांबू कचरे (वय २२, रा. वाघजाईनगर, कात्रज, मूळ रा. हारपुड, पो. वरोती, ता. वेल्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंकुश कचरे याच्याविरुद्ध यापूर्वी शरीराविरुद्धचे तीन गुन्हे दाखल आहेत. खानापूर येथील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर पाच ते सहा दरोडेखोरांनी २६ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प्रवेश करून शस्त्राचा धाक दाखविला.
दुकानातील ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने असा १ कोटी ५ लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता. याबाबत राणी अमोल बाबर यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या.
स्थानिक गुन्हे शाखेची चार व हवेली, वेल्हे पोलीस ठाण्याची प्रत्येकी एक अशी एकूण सहा पथके तयार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली दरोडेखोरांचा तपास सुरू करण्यात आला.
या गुन्ह्यात दोन मोटारसायकलींचा वापर झाल्याचे व पाच दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकांनी सीसीटीव्हीच्या आधारे मोटारसायकलींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली.
दरोडेखोर दरोडा टाकल्यानंतर पानशेतकडे गेल्याचे साक्षीदारांनी सांगितले. पुढील तपासात दरोडेखोरांनी दोन्ही मोटारसायकली वेगवेगळ्या मार्गाने वेल्हे गावाच्या दिशेने तसेच सिंगापूर डोंगरातील जंगलाकडे नेल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस हवालदार अमोल शेडगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश कचरे याने त्याच्या इतर साथीदारांमार्फत दरोडा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सिंगापूर डोंगरातील जंगलातून दोघा आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी तीन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वापरलेला कोयता व ५६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, महादेव शेलार, दत्ताजीराव मोहिते, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, शीतल ठेंबे, संजय सुतनासे, सुभाष गिरे, दिलीपराव शिंदे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष तोडकर, संतोष भापकर, युवराज सोमवंशी, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, राहुल पवार, साबळे, संदिप वारे, भारत मोहोळ, अक्षय नवले, दीपक गायकवाड, विजय कांबळे, अशोक तारू, अजय पाटसकर, समाधान चोरमले, ऋषिकेश गायकवाड, रोहित मरभळ, पोलीस पाटील गणेश सपकाळ, आकाश पाटील, चालक सोमनाथ नाधव, स्वप्निल साळुंखे, नीलम निकम, स्नेहल कामठे तसेच होमगार्ड विजय कटके यांनी केली आहे.
















