भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून एकूण सात जैन समाजातील उमेदवार मैदानात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, यंदाच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार अनेक प्रभागांतून रिंगणात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी जैन समाजातील नेतृत्वावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने शहराच्या राजकारणात जैन समाज पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. पुणे शहरात सुमारे एक लाखांच्या आसपास जैन मतदारसंख्या असल्याने या उमेदवारांचे यश-अपयश महापालिकेतील सत्तासमीकरणावर प्रभाव टाकणारे ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक ८ : सपना छाजेड यांची मजबूत कौटुंबिक व राजकीय पार्श्वभूमी – प्रभाग क्रमांक ८ औंध–दापोडी येथून भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या सपना छाजेड या माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्या सून आहेत. तसेच त्यांचे पती आनंद छाजेड हे या भागातील माजी नगरसेवक असल्यामुळे छाजेड कुटुंबाची या परिसरात मजबूत पकड आहे. राजकीय वारसा, ओळखीचा जनसंपर्क आणि संघटनात्मक ताकद यामुळे सपना छाजेड यांची उमेदवारी भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
प्रभाग क्रमांक २० : महेंद्र मुथा यांचा जनसंपर्क आणि युवा फौज – प्रभाग क्रमांक २० मधून भाजपकडून निवडणूक लढवत असलेले महेंद्र मुथा हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय आहेत. सातत्याने जनतेच्या अडचणी सोडवल्यामुळे त्यांनी या भागात मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. या प्रभागात सुमारे दहा हजारांहून अधिक जैन मतदार असून, मुथा हे आनंद दर्शन युवा मंचचे अध्यक्ष असल्यामुळे सुमारे शंभरहून अधिक तरुणांची संघटित फौज त्यांच्या प्रचारयंत्रणेचा महत्त्वाचा घटक ठरत आहे.
प्रभाग क्रमांक २१ : जैन समाजातच थेट लढत – प्रभाग क्रमांक २१ मध्ये यंदा जैन समाजातील उमेदवारांमध्येच थेट राजकीय सामना रंगताना दिसत आहे. भाजपकडून माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांचे पती प्रवीण चोरबेले हे देखील याच प्रभागातील माजी नगरसेवक असल्याने चोरबेले कुटुंबाची राजकीय पकड मजबूत आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सामाजिक कार्यकर्ते भरत सुराणा यांच्या पत्नी योगिता सुराणा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या प्रभागात जैन समाजातील दोन कुटुंबांमध्ये थेट सामना होत असून, जैन समाजाचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच प्रभागातून काँग्रेसने वेगळ्या गटातून अक्षय जैन या नव्या आणि युवा चेहऱ्यालाही संधी दिली आहे. एचएनडी हॉस्टेल आंदोलनात अक्षय जैन यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका यामुळे ते सध्या जैन समाजात विशेष लोकप्रिय ठरत आहेत. तरुण मतदारांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रभाग क्रमांक ३९ : बाळासाहेब ओसवाल यांची निर्विवाद ताकद – अप्पर परिसरासारख्या दाट लोकवस्तीच्या भागातून सलग तीन वेळा निवडून येणारे बाळासाहेब ओसवाल हे यापूर्वी शिवसेनेत होते; मात्र आता ते भाजपमध्ये आले आहेत. प्रचंड जनसंपर्क आणि तातडीने काम करून देणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेब ओसवाल यांना विजयासाठी फारसा संघर्ष करावा लागणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
प्रभाग क्रमांक ३५ : भरत भूरट यांची राष्ट्रवादीकडून नवी खेळी – प्रभाग क्रमांक ३५ मधून पूर्वी भाजपमध्ये असलेले भरत भूरट हे यंदा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. समाजासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मागील तीन ते चार वर्षांत प्रभाग क्रमांक ३५ मधील अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे.मात्र भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती घेतल्याचे बोलले जात आहे.
जैन समाजाचा कौल ठरणार निर्णायक – पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा जैन समाजाचे प्रतिनिधित्व लक्षणीय असून, या सातपैकी किती उमेदवार विजयी होतात, यावर जैन समाजाची राजकीय ताकद अधोरेखित होणार आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून, जैन समाजाचे एकसंघ मतदान कुणाच्या पारड्यात जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
















