जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी महिलेवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या झालेल्या वाटपपत्राच्या नोंदीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची केवळ प्रत देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ ३० रुपये भरून ज्या निकालाची प्रत मिळू शकते, त्यासाठी ही महिला उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागत होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सुनंदा अशोक वागसकर-येवले (वय ६१, रा. केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका ६१ वर्षीय शेतकऱ्याने तक्रार दिली होती. त्यांच्या ६२ वर्षीय मामेबहिणीच्या वडिलोपार्जित जमिनीच्या झालेल्या वाटपपत्राच्या नोंदीची केस भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे सुरू आहे.
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. सुनंदा वागसकर या भंडारे यांच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकरीस आहेत. त्या केसच्या निकालाची प्रत देण्यासाठी वागसकर आणि सिद्धार्थ भंडारे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यावेळी तक्रारदाराने आपल्या बहिणीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ती पैसे देऊ शकत नसल्याचे सांगत, आपल्याकडील १० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यावर सुनंदा वागसकर यांनी, “साहेब काय शिपाई आहेत का, माझेच १० हजार रुपये होतील. तुम्ही साहेबांना जाऊन भेटा,” असे सांगितले.
यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने १४ नोव्हेंबर रोजी पडताळणी दरम्यान, सुनंदा वागसकर यांनी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडील सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणाच्या निकालाची प्रत देण्यासाठी स्वतःसाठी व उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी एकूण १ लाख रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
सुनंदा वागसकर यांनी लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुनंदा अशोक वागसकर-येवले यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर पुढील तपास करीत आहेत.
नगरपरिषद निवडणुकीमुळे उपजिल्हाधिकाऱ्यांची पडताळणी नाही – सुनंदा वागसकर यांनी उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याचे सांगितल्याने त्यांची पडताळणी करणे आवश्यक होते. मात्र, सिद्धार्थ भंडारे हे नगरपरिषद निवडणूक ड्युटीवर बाहेर असल्याने ते उपलब्ध नव्हते. फोनद्वारे त्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु त्यांनी फोन उचलला नाही. दरम्यान, तक्रारदाराने १६ ऑक्टोबर रोजी ३० रुपये भरून निकालाची प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार १० डिसेंबर रोजी निकालाची प्रत मिळाली. वागसकर यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालयातून शिरूर येथे झालेली आहे. बदली झाल्यामुळे त्यांनी तक्रारदाराचा फोन घेतला नाही. वागसकर यांची बदली व प्रलंबित असलेल्या निकालपत्र आदेशाचे काम पूर्ण झाल्याने उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे लाच मागणार नाहीत, अशी तक्रारदाराची खात्री झाली. नगरपरिषद निवडणुकीची ड्युटी असल्याने सिद्धार्थ भंडारे कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे त्यांची पडताळणी होऊ शकली नाही.
















