वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या रागातून कानाखाली मारहाण : तिघांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ट्रिपल सीट जात असताना गाडी अडवून दंडात्मक कारवाई केल्याच्या कारणावरून चौघा गुंडांनी वाहतूक पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून कानाखाली मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नर्हे पोलिसांनी तिघा गुंडांवर कारवाई केली आहे.
लकी गौरव आनंद (वय २१), साहिल प्रकाश चिकणे, श्रावण रमेश हिरवे (रा. नांदेड फाटा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सिंहगड रोड वाहतूक विभागातील ४८ वर्षीय पोलीस हवालदार यांनी नर्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना सिंहगड रोडवरील धायरी फाटा चौकात ३० डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फिर्यादी धायरी फाटा चौकात वाहतूक नियमन व दोषी वाहनांवर कारवाई करीत होते.
त्यावेळी तिघे जण ट्रिपल सीट जात असताना पोलीस हवालदारांनी त्यांना थांबवले व कागदपत्रे मागितली. मात्र त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने ते तसेच पुढे निघून गेले. त्यामुळे संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दंडात्मक कारवाईचा राग आल्याने आरोपी परत आले. दुचाकीवरील दंडावरून लकी आनंद व साहिल चिकणे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ करून हवालदाराला धक्काबुक्की केली.
श्रावण हिरवे याने त्यांच्या कानाखाली मारले तसेच त्यांच्या शर्टची गचांडी धरून पुढील दोन बटणे तोडून त्यांचा गणवेश फाडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार फरार आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.















