पूर्ववैमनस्यातून कृत्य, फुरसुंगी पोलिसांनी दोघांना केली अटक, अल्पवयीन मुलगा ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दोन-अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तिघांनी तरुणाला गाडीत घालून मोकळ्या मैदानात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून व लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घुण खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. फुरसुंगी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
प्रसाद विरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखलेवाडा, नंदुरवेस गल्ली, परळी वैजनाथ, जि. बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. किरण भैरु चव्हाण (वय ३२) आणि रोहित भरत गायकवाड (वय १८, दोघे रा. संतोषी माता कॉलनी, ड्रीम्स आकृती, काळेपडळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही घटना काळेपडळ येथील ड्रीम्स आकृती येथे तसेच संकेत विहार येथील मोकळ्या मैदानात ३० डिसेंबर रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद देवज्ञे हा मिळेल तेथे मोलमजुरी करत होता.
किरण चव्हाण व रोहित गायकवाड यांच्यावर यापूर्वीही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. प्रसाद व आरोपी यांच्यात दोन-अडीच महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. मंगळवारी दुपारी ड्रीम्स आकृती येथे प्रसाद आला असताना आरोपी तेथे आले.
त्यांनी बांबूने त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवून संकेत विहार येथील गणपती मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार अधिक तपास करीत आहेत.
















