पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, उलट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आपल्याला एबी फॉर्म दिला असतानाही पक्षाने दुसऱ्यालाही आणखी एक एबी फॉर्म दिल्याचे पाहून शिवसेनेच्या एका उमेदवाराने आपल्या पक्षाच्याच उमेदवाराचा एबी फॉर्म चक्क चावून गिळला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही; उलट पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
उद्धव लहु कांबळे (वय ३४, रा. विवेकानंदनगर कॉलनी, धनकवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या उमेदवाराचे नाव आहे. याप्रकरणी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा प्रतिक भूतकर (वय ५८, रा. वेल्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार कात्रज येथील धनकवडी-सहकारनगर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी-सहकारनगर निवडणूक कार्यालयात बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होती.
शिवसेना शिंदे गटाकडून मच्छिंद्र ढवळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यापूर्वी, ३० डिसेंबर रोजी शिवसेना शिंदे गट या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला होता. उद्धव कांबळे यांनी अर्जांची छाननी होण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाचा दुसरा एबी फॉर्म सादर केला.
मात्र, मुदतीत मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज प्राप्त झाल्याने तो वैध ठरविण्यात आला. उद्धव कांबळे यांनी सादर केलेला एबी फॉर्म मुदतीत न आल्याने तो नाकारण्यात आला. त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नसली, तरी अपक्ष म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्यात आला.
आपला एबी फॉर्म अवैध ठरविण्यात आल्याचे लक्षात येताच उद्धव कांबळे यांनी सर्व फॉर्म पाहण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार कार्यालयीन कर्मचारी हरीदास सोलनकर यांनी सर्व उमेदवारी अर्ज त्यांना दाखविले.
मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज पाहत असताना त्यासोबत जोडलेला एबी फॉर्म त्यांनी फाडला आणि तोंडात टाकून ते बाथरूमकडे पळाले. त्यांनी तो फॉर्म चावून गिळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षात अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने त्यांनी फॉर्म गिळला तरी काही फरक पडला नाही.
उलट पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील पुढील तपास करीत आहेत.
















