नववर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणारे नाकाबंदीत पकडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नववर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत पिंपरीमध्ये २४० मद्यपी तर पुण्यात २०८ मद्यपी वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत.
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली होती. शहरातील विविध भागांत २९ ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली.
या कारवाईत २०८ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी ब्रीथ अॅनालायझर यंत्राचा वापर केला. यंत्राला जोडलेली प्लास्टिक नळी (ब्लोअर पाईप) प्रत्येक तपासणीनंतर नष्ट करण्यात आली.
नववर्षाच्या रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांत २०८ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड परिसरात पोलिसांनी १३ वाहतूक विभागांमार्फत ४७ ठिकाणी नाकाबंदी लावली होती.
नाकाबंदी दरम्यान २२० दुचाकीस्वार व २० चारचाकी वाहनचालक, असे एकूण २४० वाहनचालक मद्यप्राशन करून गाडी चालवित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर न्यायालयात ड्रंक अँड ड्राइव्हचे खटले दाखल करण्यात येत आहेत.
















