अन्नद्रव्य व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि विभाग जिल्हा परिषद, धाराशिव आणि कृषि विभाग पंचायत समिती, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, भूम येथे “द्राक्ष व डाळिंब पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन” या विषयावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यास तालुक्यातील द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. प्रविण वैद्य (अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, परभणी), डॉ. हरिहर कौसडीकर (विभाग प्रमुख, मृदा विज्ञान विभाग, कृषि महाविद्यालय, परभणी) आणि डॉ. महेश वाघमारे (सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धाराशिव) हे तज्ज्ञ उपस्थित होते. तसेच महेश बिडवे (कृषि अधिकारी, पंचायत समिती, भूम) आणि अतुल ढवळे (तालुका कृषि अधिकारी, भूम) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान डॉ. हरिहर कौसडीकर यांनी द्राक्ष व डाळिंब पिकांसाठी मृदा तपासणीचे महत्त्व, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, संतुलित खतांचा वापर तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची भूमिका याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर व शास्त्रीय मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रविण वैद्य यांनी जमीन व जमिनीचे प्रकार, जमिनीनुसार योग्य पिकांची निवड आणि उत्पादन वाढीसाठी मृदा आरोग्य व्यवस्थापन यावर सखोल माहिती दिली.
मेळाव्यात शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांनी प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून उत्तरे देत शंका निरसन केले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व प्रभावी सूत्रसंचालन महेश बिडवे (कृषि अधिकारी, पंचायत समिती, भूम) आणि डॉ. महेश वाघमारे (सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, धाराशिव) यांनी केले.
एकूणच हा शेतकरी मेळावा द्राक्ष व डाळिंब पिकांच्या उत्पादन व गुणवत्तावाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे मार्गदर्शन मिळाल्याने भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
















