४८ तासांत बेपत्ता अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी तत्परता व कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण घडवत अवघ्या ४८ तासांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा पुणे येथून सुखरूप शोध घेऊन त्यास पालकांच्या स्वाधीन केले आहे.
बार्शी शहरातील टिळक चौक येथे राहणारे दशरथ शहाजी चव्हाण यांचा १३ वर्षीय मुलगा श्रेयश दशरथ चव्हाण हा दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गु.र. नं. ०३/२०२६ भा.न.सं. कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तातडीने दखल घेत तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे यांना तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाला शोधकार्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथकाने बार्शी व कुर्डुवाडी बस स्थानक, तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. तपासाअंती मुलगा पुणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पथकाने त्वरित पुणे येथे शोधमोहीम राबवून दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी अल्पवयीन मुलगा श्रेयश चव्हाण याचा सुखरूप शोध घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यास पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या यशस्वी कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रियत यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोहेकॉ विश्वजीत ठोंगे, प्रमोद केकाण, पोकॉ राहुल उदार, बाळकृष्ण मुठाळ, सतीश उघडे, वैभव भांगे यांनी पार पाडली.
बार्शी शहर पोलिसांच्या या तत्परतेमुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
















