फिटनेस, ऐक्य आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पोलीस व नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास, सामाजिक ऐक्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या ‘युनिटी रन’ या उपक्रमाचे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बावधन पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी आयोजन करण्यात आले. बावधन पोलीस चौकीच्या आवारात पार पडलेल्या या ५ किलोमीटरच्या दौडीत पोलीस, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
देशाचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलाचा सन्मान, नागरिकांमध्ये फिटनेसची जाणीव आणि राष्ट्रीय ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व बावधन पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युनिटी रन’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बावधन पोलीस चौकीच्या आवारातून सुरू झालेल्या या ५ किलोमीटरच्या दौडीत पोलीस कर्मचारी, सूर्यदत्त ग्रुपचे विद्यार्थी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस व नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, परस्पर सन्मान आणि ऐक्यभावना वृद्धिंगत करणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागी उत्साहाने सहभागी झाले असून, “एकतेतूनच राष्ट्राची प्रगती” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
यामध्ये डॉ. सीमि रेठरेकर (प्राचार्या, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस – कॉलेज ऑफ फिजिओथेरपी), पल्लवी लेले (प्राचार्या, सूर्यदत्त नर्सिंग कॉलेज) तसेच श्री. संदीप धोरे (प्राध्यापक, सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी) यांचा विशेष सहभाग लाभला.
त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत ऐक्य व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक प्रभावी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध धर्म आणि संस्कृती दर्शवणारे पारंपरिक पोशाख परिधान केले होते.
यामुळे “विविधतेत एकता” ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकार होताना दिसली. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे राष्ट्रीय ऐक्य, परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश उपस्थितांपर्यंत ठळकपणे पोहोचला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, टीमवर्क आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांचा विकास होण्यास चालना मिळाली. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग संस्थेच्या सर्वांगीण विकास, नागरी कर्तव्यभावना आणि समाजकल्याणाच्या उद्दिष्टांशी सुसंगत ठरत आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया तसेच उपाध्यक्ष सौ. सुषमा एस. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे विशेष कौतुक करत, समाजात ऐक्याचा संदेश पोहोचविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
या ‘युनिटी रन’ उपक्रमातून सूर्यदत्त ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करत, शिस्त, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या मूल्यांची प्रभावी जाणीव निर्माण केली. हा उपक्रम भविष्यातील सक्षम, जागरूक आणि जबाबदार नागरिक घडविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत फिटनेस हि यशाची पहिली गुरुकिल्ली आहे. पोलीस हे समाजाचे रक्षणकर्ते आहेत. त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. केवळ पुस्तकी ज्ञान देणे नव्हे, तर सुसंस्कृत, जबाबदार नागरिक घडवणे हे सूर्यदत्त संस्थेचे ध्येय आहे. अभ्यासासोबत सामाजिक ऐक्य, पोलिसांप्रती आदर आणि नागरिकत्वाची जाणीव राखणे अत्यंत आवश्यक असून आमचे विद्यार्थी या सर्व बाबींमध्ये अग्रस्थानी आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
















