विश्रांतवाडी पोलिसांनी उत्तमनगरमधील दोघांना केली अटक : मृतदेह अद्याप शोधात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडण्याच्या कारणावरून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
सततच्या भांडणामुळे दोन्ही मुलांवर आधीच गुन्हे दाखल झाल्याने आईने त्यांना घेऊन उत्तमनगर सोडले आणि टिंगरेनगरला स्थलांतर केले. या पार्श्वभूमीवर, जुन्या भांडण्याच्या कारणावरून मैत्रिणीच्या मदतीने १७ वर्षाच्या अमनसिंग गच्चडला बोलावून घेऊन त्याचे अपहरण केले. अपहरणात सामील असलेले दोघे आरोपी व दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दगड व कोयत्याने अमनसिंग गच्चड याचा खून केल्याचे कबूल केले.
अटक केलेल्यांची नावे प्रथमेश चिंधु आढळ (वय १९, रा. उत्तमनगर) आणि नागेश बालाजी धबाले (वय १९, रा. शिवणे). खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे अमनसिंग सुरेंद्रसिंग गच्चड (वय १७, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) अमनसिंगची आई ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आली आणि सांगितले की, २९ डिसेंबर रोजी तिचा मुलगा दुचाकी घेऊन निघाला, परंतु परत आला नाही.
पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद करून तपास सुरू केला. मोबाईल सीडीआर व लोकेशनच्या आधारावर पोलीसांना अमनसिंग उत्तमनगर येथे असल्याचे आढळले.तपासादरम्यान पोलीसांना माहिती मिळाली की, अमनसिंग याला प्रथमेश आढळ आणि नागेश धबाले यांनी जुन्या भांडण्याच्या कारणावरून बोलावून घेऊन अपहरण केले.
आरोपी कर्नाटकातील बेळगाव येथे असल्याचे आढळले आणि तेथून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कबूल केले की, त्यांनी अमनसिंग याला खेड शिवापूर येथे दगड व कोयत्याने मारून खून केले. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. दोन अल्पवयीन मुलांना निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
अमनसिंग गच्चड, त्याची आई अनिता गच्चड आणि भाऊ यांचा पूर्वी उत्तमनगर येथे वास्तव्य होते, जिथे सतत भांडणे घडत होते. यामुळे त्यांनी टिंगरेनगरकडे स्थलांतर केले होते. पोलिस तपासादरम्यान मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी सांगितले.
















