महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा, असे सांगणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिवसभर त्यांच्या पाषाण येथील पंचवटीमधील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधव गाडगीळ यांच्या मागे मुलगी, मुलगा, जावई, सून आणि नाती असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले होते. माधव गाडगीळ यांचे ‘सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यातून त्यांनी आपल्या जीवनातील ६५ वर्षांत पर्यावरण वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मिळते.
माधव गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुणे जिल्ह्यात झाला. शालेय शिक्षण मॉडर्न विद्यालयात पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदवी शिक्षण पुणे विद्यापीठातून, तर पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले.
७०च्या दशकात हार्वर्ड विद्यापीठात गाडगीळ यांनी गणितीय पर्यावरणशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली. एका जीवशास्त्र विद्यार्थ्याला मॅथेमॅटिकल इकोलॉजीमध्ये प्रथमच अशी पदवी विद्यापीठाने दिली होती.
भारतात परतल्यानंतर ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी १९७३ ते १९८३ या कालावधीत इकोलॉजी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. १९८३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली सेंटर फॉर इकोलॉजिकल सायन्सची स्थापना करण्यात आली.
उत्क्रांती, पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र आणि पर्यावरणीय इतिहास या क्षेत्रांत काम करत असताना गाडगीळ यांनी २२५ हून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध केले. वेस्टर्न घाट म्हणजेच सह्याद्रीमध्ये माधव गाडगीळ यांनी तेथील स्थानिक समाजाला बरोबर घेऊन जवळपास चार दशके काम केले.
तसेच ईशान्य भारतातील जैवविविधताही त्यांनी तेथील लोकांना बरोबर घेऊन अभ्यासली.बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अॅक्ट २००२ तयार करताना त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. पश्चिम घाट (सह्याद्री) परिसर समितीमध्ये २००९ साली माधव गाडगीळ यांनी अध्यक्ष म्हणून काम केले.
या समितीमुळे पश्चिम घाटातील जैवविविधता लोकांना बरोबर घेऊन कशी वाचविता येईल, याबाबत अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. अनेक पुस्तके लिहिणारे आणि अनेक पर्यावरणीय व स्थानिक सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागी असलेले ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख होती.
माधव गाडगीळ यांना मानाचा समजला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.


















