पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात प्रवेशासाठी न्यायालयात केला होता अर्ज
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मोक्का गुन्ह्यात जामीन देताना पुणे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेला गँगस्टर गजा मारणे याला पत्नीच्या प्रचारासाठी शहरात येण्यास परवानगी मागणारा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. गजा मारणे सध्या मुळशी येथील त्याच्या घरी राहत आहे. तेथूनच तो ‘पत्नीला निवडणुकीत मदत करा’ अशी फोनाफोनी कोथरूडमधील लोकांना करत आहे. पुणे पोलिसांचे त्याच्या हालचालींवर लक्ष आहे.
संगणक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात गजा मारणे याला महापालिका निवडणुकीपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये त्याला पुणे शहरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
पत्नी जयश्री मारणे निवडणुकीला उभी आहे. तिला प्रचारात मदत करण्यासाठी पुणे शहरात येऊ द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज गजा मारणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. त्याला पोलिसांनी विरोध केला होता.
गजा मारणे याला शहरात प्रवेश दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावताना त्याला मतदानाच्या दिवशी व न्यायालयीन तारखांना हजर राहण्यासाठी पुणे शहरात येण्यास सवलत दिली आहे.
पुण्यातील ६० उमेदवारांवर गंभीर गुन्हे – पुणे शहरातील विविध पक्षांच्या ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांची यादी तयार केली आहे. चारित्र्य पडताळणीसाठी (कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट) २,६५० जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी दीड हजार जणांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पडताळणीत मिळाली आहे. यामध्ये आंदोलन किंवा किरकोळ राजकीय गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी ६० उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अशा उमेदवारांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे.
महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. गजा मारणे याने काहीजणांशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त


















